एलपीजी तुटवड्यामुळे नवी FIFO प्रणाली लागू; इन्स्टंट बुकिंग बंद, दरातही वाढ!

1 Min Read

दि.०३(पीसीबी)- देशात सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ म्हणजेच FIFO प्रणाली लागू केली आहे.

या नव्या नियमानुसार, आधी बुकिंग केलेल्या ग्राहकांना प्राधान्याने सिलिंडर दिले जाणार असून त्यानंतरच नवीन बुकिंग स्वीकारले जाईल. तसेच काळाबाजार रोखण्यासाठी गॅस एजन्सींना केवळ दीड दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, ‘इन्स्टंट बुकिंग’ आणि तात्काळ डिलिव्हरी सुविधा सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली असून, घरपोच गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना ओटीपी देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या निर्णयाचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसला असून, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजनेवर परिणाम झाला आहे. गॅसअभावी काही ठिकाणी पारंपरिक चुलींचा वापर करून स्वयंपाक करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून अखंडित गॅस पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २१८ रुपयांची वाढ झाल्याने व्यावसायिक वापराचा खर्चही वाढला आहे. तसेच इंधन साठवणूक आणि वापरावरही प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत.एकूणच, एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे बदल ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत.

Share This Article