भोंदूबाबा अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

PCB Admin
2 Min Read

दि.०१(पीसीबी)-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (1 एप्रिल) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर केलं होतं.

अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातविरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती.

अशोक खरातच्या समोर पुजारी, CA, सराफा व्यावसायिकाला बसवलं
एसआयटीकडून अशोक खरातची काल पुण्याचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. एसआयटीनं चौघांची सहा तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या चौकशीतून खडे, रत्न सोन्याच्या बदल्यात अशोक खरात बनवाबनवी करत असल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्जप्रकरणाचीही माहिती चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. एका बँकेचा मॅनेजर आणि इतरांना मिळून अशोक खरातने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा एसआयटीला संशय आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या सोन्यच्या किंमतीत खरेदी-विक्रीमध्ये लाखोंचा नफा मिळवल्याची माहिती देखील समोर आली आहे.

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Share This Article