यवतमाळ हादरलं! ७ वर्षीय चिमुकलीची शेजाऱ्यांकडून हत्या

2 Min Read

दि.२२ (पीसीबी)-यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोथ गावात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून अवघ्या ७ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुकली २० मार्चपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. २१ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः पथकासह बोथ गावात दाखल झाले आणि शोधमोहीम राबवण्यात आली.

दरम्यान, चिमुकलीच्या घराशेजारी राहणाऱ्या कैलास जाधव यांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी संशयास्पद आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या झाडाझडतीदरम्यान घरातच एका पोत्यात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.

यानंतर पोलिसांनी कैलास जाधव यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात जाधव कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी कैलास विलास जाधव, माला विलास जाधव, सोनी विलास जाधव आणि रंजना सोनू जाधव यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

तपासादरम्यान, चिमुकलीच्या नाकातील सोन्याचा दागिना गायब असल्याचेही आढळून आले असून, त्या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे.एकूणच, शेजाऱ्यांनीच केलेल्या या क्रूर कृत्यामुळे यवतमाळ जिल्हा हादरला असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share This Article