अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठ्ठी ताकद मिळणार

2 Min Read

प्रवेशासाठी माजी नगरसेवकांसह ७९ दिग्गजांची यादी

पिंपरी, दि . १६ ( पीसीबी )  – उपमुख्य़मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आजवरची सर्वात मोठ्ठी ताकद मिळणार असल्याने पक्षाला हत्तीचे बळ येणार आहे. स्वबळावर तीन-चार वेळा जिंकलेल्या आपापल्या भागात वलय असलेल्या दिग्गज अशा तब्बल ७९ माजी नगरसेवकांची यादी तयार झाली आहे. दादांच्या उपस्थितीत प्रवेश कऱणाऱ्यांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह मागच्या पंचवार्षीक मधील २७ वजनदार माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रभावी नेत्यांचाही प्रवेश करणाऱ्यांत समावेश असणार आहे.

भाजप आमदार महेश लांडगे यांच्या बालेकिल्ल्यात भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उद्या १७ जून रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मोठी घोषणा करणार असल्याचीही चर्चा आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की भाजप आणि शिंदे गटाला बरोबर घेऊन महायुतीत लढायचे त्याची चाचपणी होणार आहे. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा भाजपने दारुण पराभव केला आणि २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला होता. २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातसुध्दा पार्थ पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. दोन्ही पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागले होते. तेव्हापासून पुन्हा या शहरात एकहाती सत्ता आणायचीच असा दृढनिश्चय अजितदादांनी केला आहे. मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तीपरिक्षण होणार आहे.
बरोबर मागच्या १७ जून २०२४ मध्ये गव्हाणे यांच्यासह २४ माजी नगरसेवकांनी दादांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. २०१७ मध्ये महापालिकेतील सत्तेचे वारे भाजपच्या दिशेने होते म्हणून राष्ट्रवादी सोडून अनेकांनी जय श्रीराम चा नारा दिला होता. आता ही सगळी नेतेमंडळी स्वगृही परतणार आहेत. स्वतः अजित पवार त्या सर्वांचे स्वागत करणार आहेत.

Share This Article