टेलिकॉम डिपार्टमेंट आणि पोलीस असल्याचे भासवून १५ लाखांची फसवणूक

PCB Admin
1 Min Read

वाकड, दि.02 (पीसीबी)
टेलिकॉम डिपार्टमेंट मधील प्रतिनिधी आणि पोलीस असल्याचे भासवून एका महिलेच्या नावाने मनी लॉन्डरिंग झाल्याचे सांगत महिलेची १५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत वाकड येथे घडली.

याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 87072656855 क्रमांक धारक आणि पोलीस उपनिरीक्षक हेमराज कोळी नाव सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन करून ती टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने सिमकार्ड खरेदी करून १५ ते २० लोकांना बेकायदेशीर मेसेज पाठवण्यात आले आहेत. तसेच त्या सिमकार्डचा वापर मनी लॉन्डरिंग साठी केला आहे. त्याबाबत टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई आणि अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या खात्यावरून २५ कोटींचे व्यवहार झाले असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादीकडून १५ लाख २५ हजार रुपये पाठवण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article