पुणे महापालिकेचे विभाजन होणार

2 Min Read

पुणे, दि.25 (पीसीबी): महापालिकेत हद्दीलगतच्या गावांच्या समावेशानंतर राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेवरील प्रशासकीय ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखी उशीर न करता पुणे महापालिकेचे विभाजन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मांडली. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत असल्याने तेथेही वेगळी पालिकेची गरज अधोरेखित करून, पुण्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस स्वतंत्र महापालिका कराव्यात, अशी मागणी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शहरातील नवनिर्वाचित आमदार व मंत्र्यांसोबत वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना पाटील व तुपे यांनी ही भूमिका मांडली. पुणे महापालिकेच्या परिसरात प्रचंड वेगाने होणारे नागरीकरण पाहता व ३२ गावांच्या समावेशानंतर पालिका प्रशासनावरील वाढलेला ताण पाहता पुण्यासाठी आणखी एका महापालिकेची गरज आहे. पाटील व तुपे यांनीही या भूमिकेचे समर्थने केल्याने सरकार लवकरच याबाबत सकारात्मक पाऊल टाकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

‘‘पीएमआरडीए’ ही काही महापालिका होऊ शकत नाही. त्यामुळे आता अधिक उशीर न करता नव्या महापालिकेचा प्रश्न मार्गी लावावा लागेल,’ असे पाटील म्हणाले. विभाजनाचा प्रश्न आला की नावावरून बरेच काही अडते. ‘पुणे’ या नावातच खूप काही दडले आहे. त्याला आर्थिक, सामाजिक, भौगोलिक कंगोरे आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी एखाद्या ‘एजन्सी’ला काम देऊन त्याचे स्वरूप तयार करून घ्यावे लागेल,’ असे पाटील म्हणाले.

सुमारे तीन वर्षांपासून पुण्यासह अनेक शहरांमध्ये प्रशासकराज आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांची कामे अडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयातील याचिकांचा निकाल जानेवारीत अपेक्षित आहे. त्यानंतर प्रभागरचना, हरकती सूचना यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा असतील. मे महिन्याच्या आसपास आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्नांना न्याय देता येईल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकांच्या तारखांचे सूतोवाच केले.

Share This Article