इंद्रायणी नदीत महिला पोलीस कर्मचाऱ्याची उडी, तपास सुरू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

आळंदी, दि. २६ ऑगस्ट (पीसीबी) – आळंदी मध्ये इंद्रायणी नदीत महिला पोलीस कर्मचारीने उडी मारली. रविवारी (दि. 25) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचे कारण समजू शकले नसून, महिलेचा शोध सुरू आहे.

अनुष्का सुहास केदार (वय 20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे उडी मारलेली पोलीस महिलेचे नाव आहे.

आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांपैकी एका युवकाने केदार यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.

Share This Article