शिवसेना गटनेतेपदी श्रीकांत शिंदे, प्रतोदपदी श्रीरंग बारणे

1 Min Read

मुंबई : देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटालाही मोठा वाटा मिळणार आहे. शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीकांत शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पक्षाचे संसदेतील प्रतोद असतील.

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 7 जागांवर शिंदे गटाचे खासदार निवडून आले. बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम मावळ आणि हातकलंगले या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक मताधिक घेण्यात श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. ते दोन लाख नऊ हजार मतांनी विजयी झालेत. औरंगाबादचे संदिपान भुमरे हे एक लाख 34 हजार 650 मतांनी विजयी झाले.

Share This Article