श्रीकांत भारतीय यांच्यावर 2024 च्या निवडणुकीची जवाबदारी – भाजप

0
181

लोकसभेसाठी ‘मिशन 45’, तर विधानसभेसाठी ‘मिशन 200’
नाशिक, दि. १२ (पीसीबी) : भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकांसाठी भाजपने ‘महाविजय 2024’अशा संकल्पाची घोषणा केली आहे. तसेच 2024 च्या निवडणुकीची जवाबदारी भाजप नेते श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आली आहे.

या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या माध्यमातून भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. लोकसभेसाठी ‘मिशन 45’, तर विधानसभेसाठी ‘मिशन 200’ जाहीर केले आहे. यासाठी श्रीकांत भारतीय हे प्रदेश संयोजक (निवडणूक इन्चार्ज) म्हणून काम पाहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची जबाबदारी भाजपने आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर सोपवली आहे. भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असून नाशिक येथे शनिवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजेंडा ठरविण्यात आला. भाजपाची राज्य कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस नाशिकमध्ये सुरू होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती.यावेळी जास्तीत जास्त मतदार पक्षाकडे कसे वळतील, आगामी निवडणुकीत विजय कसा साकार करता येईल, याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

कोण आहेत श्रीकांत भारतीय?

श्रीकांत भारतीय हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तसेच त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखलं जातं. श्रीकांत भारतीय हे अभ्यासू असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना ते त्यांचे OSD होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी श्रीकांत भारतीय भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. आक्रमकतेने सेनेच्या अंगावर जाणारे म्हणूनही श्रीकांत भारतीय यांची ख्याती आहे. ते सध्या विधानपरिषदेत आमदार आहेत. तर आता त्यांच्याकडे भाजपने प्रदेश संयोजक (निवडणूक इन्चार्ज) म्हणून जाबाबदारी सोपवली आहे.