भाजपने राज्यातील राजकारणाचं गटार केलंय

2 Min Read

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून शिवसेवेच्या ठाकरे गटाने भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजपने राज्यातील राजकारणाचं गटार केलं आहे. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन हे राजकारण सुरु आहे. अजितदादांची मनाची तयारी होती. म्हणून त्यांना कोणी रोखलं नाही,असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यपाल रमेश बैस यांची भूमिका भगतसिंह कोश्यारी यांच्या पुढची आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे. राष्ट्रवादी जे आमदार फुटले त्यांनी कळवले की नाही हे माहीत नाही. पण या शपथविधीमुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, असं दानवे म्हणालेत.

अजित पवार सकाळी दुपारी लोक झोपलेले असताना शपथ घेतात. भाजपने देशातील, महाराष्ट्रातील राजकारण नासवलं आहे. पार्टी विथ डिफ्रान्स म्हणणारी पार्टी सत्तेसाठी काहीही करायला लागली आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीकास्त्र डागलं आहे.

काहीही फरक पडणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी नाव घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली. आज त्याच लोकांना सोबत घेतलं आहे.अजित पवार यांना भाजपने सोबत घेतलं आहे. आम्ही आमची कातडी वाचवण्यासाठी जातो. नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसतो, अशी या लोकांची भूमिका आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनीही टीका केली आहे.

अजित पवार यांना गद्दार म्हणायचं की नाही तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. आमचा मराठी भाषेतला शब्द गद्दारी आहे.तो आम्ही शिंदे गटासाठी वापरतो कारण त्यांनी गद्दारीच केली आहे, असं सावंत म्हणालेत.

Share This Article