गाववाला असल्याचे म्हणत महिलेचा विनयभंग दोघांना अटक

1 Min Read

देहूरोड, दि. ७ (पीसीबी) – मी इथला गाववाला आहे. तू काय करणार, असे म्हणत दोघांनी मिळून पतीला शोधत निघालेल्या महिलेची छेड काढली. दरम्यान तिथे महिलेचा पती आला, त्याला दोघांनी मारहाण केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना आदर्शनगर, किवळे येथे सोमवारी (दि. ६) मध्यरात्री घडला.

अमित गजानन वानरे (वय ३२, रा. किवळे) व सुलतान युसुफ खान (वय २७, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीला शोधण्यासाठी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास मुकाई चौक येथे जात होत्या. त्या आदर्शनगर किवळे येथे आल्या असता तिथे दुचाकीवरून आलेल्या अमित याने फिर्यादीस हटकले. फिर्यादीची त्याने छेड काढली. दरम्यान फिर्यादीचे पती तिथे आले असता त्यांना अमितने मारहाण केली. महिलेने पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाईल काढला असता त्याने महिलेचा मोबाईल रस्त्यावर आपटून नुकसान केले. त्यानंतर सुलतान याला बोलावून घेतले. तू मला ओळखतेस का, मी इथला गाववाला आहे. तू काय करणार, अशी धमकी देत गैरवर्तन करत महिलेच्या पोटावर लाथ मारली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article