कंटेनर अडवून चालकांना लुटले

1 Min Read

चाकण, दि. १३ (पीसीबी) – चाकण-तळेगाव रोडवर दोन कंटेनर अडवून तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत दोन कंटेनर चालकांना लुटले. ही घटना गुरुवारी (दि. १२) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास मनोहर नगर कमानीजवळ घडली.

हेमंत उर्फ पियुष बाळू धोत्रे (वय २१), सुमित राकेश गलीयल (वय २०, दोघे रा. तळेगाव स्टेशन), अनिकेत दादाभाऊ धायबर (वय २२, रा. वतननगर, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संजीत श्रीकाली ठाकूर (वय २५, रा. सोमाटणे, ता. मावळ. मूळ रा. झारखंड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकूर आणि त्यांचा मित्र कार ट्रेलर घेऊन चाकण-तळेगाव रोडने महिंद्रा कंपनीत जात होते. गुरुवारी मध्यरात्री ते तळेगाव येथील मनोहरनगर कमानीजवळ आले असता नंबरप्लेट नसलेल्या मोपेड दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी कंटेनर अडवून ठाकूर आणि त्यांच्या मित्राला मारहाण केली. हातात गज घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर ठाकूर आणि त्यांच्या मित्राच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम, ब्ल्यू टूथ, स्पीकर असा ३५ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article