आजोबावर उपचार करा म्हणत नातवाची डॉक्टरला मारहाण

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – आजोबांना कमरेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात आणल्यानंतर नातवाने माझ्या आजोबावर आत्ताच्या आता उपचार करा, असे म्हणत रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री पावणे दहा वाजता डॉ. डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटल येथे घडली.

डॉ. शिवाप्पा रविंद्र देवरमनी (वय 26, रा. पिंपरी. मूळ रा. कर्नाटक) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुर्गेश राजन पुराणीक (वय 28, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. आरोपी दुर्गेश हा त्याचे आजोबा कालिदास गजानन पुराणिक (वय 96, रा. मोशी) यांना घेऊन गुरुवारी रात्री रुग्णालयात आला. कालिदास पुराणिक यांच्या कमरेमध्ये फ्रॅक्चर असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी फिर्यादी घेऊन जात होते. त्यावेळी आरोपीने पेशंटला कुठेही न्यायचे नाही. तेवढी गरज असेल तर तुमच्या कार्डियाक डॉक्टरांनाच इथे बोलवा. तुमची आत्ताच्या आत्ता माझ्या आजोबांचे ऑपरेशन करा, असे म्हणून दुर्गेश याने फिर्यादींच्या कानाखाली मारली. त्याने जोरजोरात शिवीगाळ करून गोंधळ केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article