उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीमुळेच शिवसेनेत फूट पडली

2 Min Read

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. ‘राज्यात अलीकडेच झालेल्या राजकीय गोंधळाला सर्वस्वी कारणीभूत उद्धव ठाकरेच असून, त्यांच्या कार्यशैलीमुळेच शिवसेनेत फूट पडली,’ असा आरोप फडणवीस यांनी केला. या मुलाखतीत फडणवीस यांनी आपले लक्ष दिल्लीवर नसून, महाराष्ट्रावरच सल्याचेही स्पष्टपणे सांगितले.

‘महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनासाठी फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. शिवसेनेच्या फुटीला त्यांची कार्यशैली कारणीभूत आहे. 30-40 आमदार त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडले आणि उद्धव ठाकरेंना ते कळले देखील नाही. उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात, ‘तुम्ही माझे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान द्यायचे. मी म्हणालो ‘एक दिवस तुमचे सरकार पडेल आणि तुम्हाला ते कळणारही नाही आणि नेमके तेच झाले,’ असेही फडणवीस म्हणाले आहेत.

भाजप-शिवसेना युतीतील मतभेदावर फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला. आम्ही जेव्हा युती करून निवडणुका लढलो, त्यावेळच्या प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल. यावेळी उद्धव ठाकरेही मंचावर उपस्थित असायचे. पण जेव्हा महत्वाकांक्षा आपल्या क्षमतांपेक्षा जास्त असतात, तेव्हा लोक असे निर्णय घेतात. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वासाठी लढलो आणि आज ते बाळासाहेबांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे, असे करत आहेत. शिवसेनेचे उर्दूमध्ये कॅलेंडर छापत आहेत, याआधी असे तुष्टीकरण शिवसेनेने कधीच केले नाही, असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे हे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी ते शत्रू नाहीत. मी अजूनही उद्धव ठाकरेंशी बोलू शकतो, पण ती केवळ राजकीय चर्चा नसेल. प्रत्येक गोष्टीला राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये, असे फडणवीस म्हणाले.

Share This Article