“1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”

0
408

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या कंगना रनौतनं वादग्रस्त वक्तव्य करत रोष ओढावून घेतला आहे. सोशल मीडियावर कंगना रनौत हिच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं’, असं वक्तव्य कंगना रनौत हिनं वृतवाहिनीच्या कार्यक्रमात केलं आहे. कंगानाच्या या वक्तव्याचा भाजप खासदार वरुण गांधी यांनी समाचार घेतला असून हा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा अपमान असल्याचा टोला लगावला आहे.

वरुण गांधी काय म्हणाले?
कंगना रनौतच्या वक्तव्याचा वरुण गांधी यांनी समाचार घेतलाय. ट्विट करत वरुण गांधी यांनी कंगनावर निशाणा साधलाय. वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या खुन्याचा सन्मान. आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारांना वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’

स्वातंत्र्याला भीक म्हणणं मानसिक दारिद्र्य दाखवणं –
वरुण गांधीयांच्याशिवाय अकाली दल पार्टीचे वरिष्ठ नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनाही कंगानाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलेय की, ‘मणिकर्णिकाची भूमिका करणारी अभिनेत्री स्वातंत्र्याला भीक कसं म्हणू शकते. लाखो शहीदांच्या बलिदानानंतर आपल्याला मिळालेल्य स्वातंत्र्याला भीक म्हणणं कंगनाचं मानसिक दारिद्र्य दाखवणारं वर्तण आहे.‘

काय म्हणाली कंगना?
एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, “स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं. “