२५ लाखाची खंडणी मागणाऱ्याचा शोध घ्या – चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
214

 

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने २५ लाख रुपये खंडणीची मागणी लोकमान्य हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्याकडे मोबाईलवरून  केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित व्यक्तीस लवकरात लवकर अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची गंभीर दखल घ्यावी. संबंधितांस त्वरित अटक करुन कठोर कारवाई करावी. कोरोना संकटात काहीजण गैरफायदा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि कोथरुड मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. माझ्या नावाचा गैरवापर करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. याविरोधात आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.‌ तर कोथरुड स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मी स्वत: पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपये द्या, पैसे न दिल्यास तुमच्याकडे बघून घेऊ, असा धमकीवजा इशारा देणारा फोन या हॉस्पिटलध्ये  करण्यात आला होता. पोलिसांनी त्या फोनचा माग घेतला असता तो मोबाईल फोन चोरीचा असल्याचे तपासात उघड झाले.