१ कोटींचे दागिने चोरणाऱ्या तिघा सराईतांच्या मुसक्या आवळल्या; गुन्हे शाखा युनिट -२ ची मध्यप्रदेशात कारवाई

0
674

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – हैद्राबादहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आरामबसमधील पुनावळे या ठिकाणाहून १ कोटी रूपयांचे सोने, हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२ आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सोमवार (दि.६) मध्यप्रदेशात केली. चोरट्यांकडून ३६ लाखांची सोन्यांची बिस्कीटे व गुन्ह्यांमध्ये वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहेत.   

या प्रकरणी दीपक पुरूषोत्तमलाल सैनी (वय २४, रा. ५/२/२९० हैदर वस्ती, जुनी पोलीस लाईनजवळ, राणीगंज, सिंकदराबाद, तेलंगणा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

याप्रकरणी मुस्ताफ समशेर खान (रा. मध्य प्रदेश)  राजेंद्र हरिश्चंद्र सोनी (वय ३८, रा. धरमपुरी, तहसिल कचेरी जि. धार) इस्माईल बाबू खान (वय ३३ रा. काळी बावडी, धरमपुरी, जि. धार) यांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून २५ लाखांची ७३१ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे,  व ११ लाखांची गुन्ह्यात वापरलेली मारूती एसक्रॉस कार असे मिळून ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली  माहितीनुसार, फिर्यादी दीपक सैनी हा १४ फेब्रुवारी २०१९ रोजी भवानी एअर लॉलेस्टीक या कुरीयर कंपनीचे सोने, हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम याची पार्सल घेऊन खासगी बसमधून हैद्राबाद येथून मुंबईला निघाला होता. दरम्यान ही बस मुंबई –बेंगलोर महामार्गावरील पुनावळे, वाकड येथील न्यु. सागर हॉटेल येथे सकाळी चहा नास्ता करण्यासाठी थांबली होती. दीपक फ्रेश होण्यासाठी बसमधून खाली उतरला असता अज्ञात इसमांनी सीट खाली ठेवलेली १ कोटींचे सोन्याची बिस्कीटे, हिरे, रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली.

हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -२ चे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांनी तपास सुरू केला.

दरम्यान, कांबळे यांनी पुणे – मुंबई महामार्गावरील हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांना संशयीत चोरट्यांची ओळख पटली. तसेच खबऱ्यांनी हे चोरटे मध्यप्रदेशातील इटावा, देवास येथील असल्याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखा आणि हिंजवडी पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करून त्यांना इटावा येथे पाठवण्यात आले. या पथकाने ८ दिवस सापळा रचून तसेच वेशांतर करून चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली.

पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक हर्षल कदम, अशोक गवारी, पोलीस नारायण जाधव, संजय गवारे, फारूक  मुल्ला,  मयुर वाडकर, संदीप ठाकरे,  किरण आरूटे, प्रविण दळे, हजरत पठाण, जमीर तांबोळी, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, दत्तात्रय बनसुडे, संपत निकम, धर्मराज आवटे, मंहमद  गौस नदाफ, नितीन बहिरट, दादा पवार, धनराज किरनाऴे,  सावन राठोड, सचिन मोरे, राजेंद्र शेटे, महेंद्र तातळे, गणेश मालुसरे, दीपक खरात, प्रमोद हिरळकर,  कुणाल, शिंदे, अमर राणे, सुभाष गुरव, रेखा धोत्रे विकी कदम या पथकाने ही कारवाई केली.