११ दिवसांची उपवास सुटताच मोदींनी दोन्ही हात जोडून वाकून गोविंददेव गिरी महाराजांना नमस्कार केला

0
95

अयोध्या, दि. २२ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २२ जानेवारीला अयोध्येतील बहुचर्चित रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. कोदंडधारी रामाच्या बालरुपातील मूर्तीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. ५०० वर्षांची प्रतीक्षा आज संपली अशी भावना आज प्रत्येक रामभक्ताच्या मनी आहे. मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडण्याआधी पंतप्रधांनानी आपण ११ दिवसांचे धार्मिक अनुष्ठान स्वीकारणार असल्याचे सांगितले होते. या कालावधीत मोदींनी ११ दिवस उपवास केला होता तसेच, जमिनीवर झोपणे, गायींना चारा खाऊ घालणे, मंदिरांना भेट देणे अशीही कामे त्यांनी केली होती. आज प्राणप्रतिष्ठाणपना सोहळ्याच्या नंतर मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हातून प्रभू रामाच्या चरणामृत प्राशन करून आपला उपवास सोडला. यावेळी गोविंदगिरी महाराजांनी मोदींचे कौतुक करत त्यांनी हे अनुष्ठान कसे पाळले याविषयी भाष्य केले.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्ठान स्वीकारण्यापूर्वी मोदींनी ३० दिवस आधीच गोविंदगिरी महाजारांशी संपर्क साधून अनुष्ठानाचे नियम विचारले होते. आज प्राणप्रतिष्ठाणपना सोहळ्याच्या नंतर जमलेल्या भाविकांना संबोधित करताना गोविंददेव गिरी महाजारांनी मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, “मी मोदींना फक्त तीन दिवस अन्नत्याग करून उपवास करायला सांगितले होते मात्र त्यांनी ११ दिवस अन्नत्याग केला. मी त्यांना ३ दिवस जमिनीवर झोपण्यास सांगितले होते पण त्यांनी ११ दिवस इतक्या कडाक्याच्या थंडीत जमिनीवर झोपून अनुष्ठान केले. या कालावधीत सांसर्गिक देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता ज्यानुसार त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून राममंदिरांना भेट दिली, तिथल्या शक्तींना मोदींनी आजच्या या सोहळ्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले.”

दरम्यान, मोदींचा उपवास सोडण्यासाठी त्यांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना व आरतीनंतर गोविंददेवगिरी महाराजांनी चरणामृत पाजले. महाराजांच्या हस्ते चरणामृत स्वीकारल्यावर मोदींनी दोन्ही हात जोडून वाकून महाराजांना नमस्कार केला. मोदींची ही कृती सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी याचे कौतुकही केले आहे.