होय, फडणवीस पुणे शहरातूनच लढणार

0
393

पुणे, दि. १९ (पीसीबी) : राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आपली जन्मभूमी असलेले नागपूर सोडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात. कारण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे तशी मागणी केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ राहिलेला आहे. या मतदारसंघात भाजपने डोळे झाकून कोणताही उमेदवार दिला तरी तो सहजपणे निवडून येऊ शकतो. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना या सेफ हाऊसमधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये पराभवाची भीती वाटत असल्यानेच ते लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचा दावा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री पद हे असंविधानीक आहे, अशाप्रकारचे ज्ञान महाराष्ट्राला देणारे, फसवणीस पणा आणि अकार्यक्षमता यामुळे भाजपाने मुख्यमंत्री पदी नाकारलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे एक मंत्री यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे म्हणून नागपूरमध्ये पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी करताय म्हणे ?, असे रुपाली पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

मोदी-शाहांनी गडकरींना संसदीय मंडळातून का काढलं, नक्की काय घडलं? काँग्रेसने सांगितलं कारण
पुणेकर जनता हुशार आहे. कुठलंही कर्तृत्व नसताना वडील व चुलतीच्या अर्थातच घरणेशाहीच्या पुण्याईवर स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी स्वतःच्या पक्षातील बहुजन नेत्यांना राजकारणात संपवून, सत्तापदे मिळवणाऱ्यांना शिवजन्मभूमी पुणेरी विसर्जन करायला आतुर आहे, असेही रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. यावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.