हेरिटेज वास्तू, चौक, रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने शासनाकडे मागितले 79 कोटी रुपये.

0
292

पुणे, दि. २१ (पीसीबी) – पुणे शहरात जी-20 परिषदेसाठी येणारे शिष्टमंडळ पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील भोसरी, शहरानजीक म्हाळुंगे, चाकण औद्योगिकपट्यात पाहणी दौरा करणार आहे. त्यामुळे शहरातील पूल हेरिटेज वास्तू यांच्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करणे, भिंती रंगविणे, चौक व रस्ते सुशोभीकरण, हेरिटेज वास्तूना आकर्षक विद्युत रोषणाई करणे इत्यादी कामासाठी अनुदानाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे महापालिकेने राज्य सरकारकडे 79 कोटी रूपयांची मागणी केली आहे.

यंदाचे जी-20 परिषेदेचे यजमान पद हे भारताला मिळाले आहे. त्यादृष्टीने देशभरात जी-20 च्या परिषदेच्या निमित्ताने कामाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही जी-20च्या निमित्ताने कामकाज सुरू झाले असून राज्यात या परिषदेच्या निमित्ताने एकूण 14 बैठका घेण्यात येणार आहेत. तर पुण्यात चार बैठका होणार आहेत. नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या जी-20 मध्ये देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असणार आहे.

जी-20 च्या परिषदेच्या पुणे शहरात चार बैठका होणार असून परिषदेसाठी येणारे शिष्टमंडळ पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील औद्योगिक भागात पाहणी दौरा करण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी शहरात सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने राज्य सरकारच्या प्रधान सचिवांना नुकतेच एक पत्र पाठविण्यात आले आहे. विविध कामांसाठी 79 कोटी रूपयांची मागणी केली आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने महापालिकेला अद्याप कोणताच प्रतिसाद आला नसल्याचेही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील मुंबई-पुणे रस्ता व सांगवी-किवळे रस्ता या दोन रस्त्यांवरील डिव्हाडर, बीआरटी रेलिंग, सब-वे, उड्डाणपुलावर पेंटिंग करणे पालिकेच्या प्रवेशद्वारावर भित्ती चित्रे तयार करणे. शहरातील विविध चौक व रस्ते दुरुस्ती, शिल्पांसह सुशोभीकरण करणे, विद्युत विषयक कामे करणे, आकर्षक पोल व फिटींग बसविणे, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर प्रकाश व्यवस्था करणे. शहरातील पूल हेरिटेज वास्तू यांच्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करणे, उद्यानामधील सुधारणा विषयक कामे करणे. रस्ता दुभाजकामधील झाडांची छाटणी करणे, लागवड करणे व सुशोभित करणे, भक्ती शक्ती उद्यानात 3 डी प्रकाश व्यवस्था यासह आदी कामांसाठी निधीची आवश्‍यकता आहे.