हॅलो… मी बजाज फायनान्स मधून बोलत आहे; असं म्हणत पोलीस पाटलांना लाखोंना फसवले

0
812

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – बजाज फायनान्स कंपनी, मुंबई येथून बोलत असल्याचे सांगून शून्य टक्के व्याजदराने 15 लाख रुपयांचे कर्ज देण्याचे अमिश दाखवून दोघांकडून 6 लाख 67 हजार रुपये घेतले. त्यानंतर कर्ज मंजूर न करता दोघांची फसवणूक केली. फसवणूक झालेल्या दोघांमध्ये एका पोलीस पाटलाचा समावेश आहे. हा प्रकार गंधर्वनगरी मोशी येथे फेब्रुवारी 2019 ते 8 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडला.

अली अनिस मोहम्मद मुमताज (रा. श्रीराम पाडा, भांडुप, मुंबई) आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बापूगौडा महादेवअप्पा पोलीस पाटील (वय 26, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याबाबत रविवारी (दि. 29) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी पोलीस पाटील यांच्या मोबाईल फोनवर फोन करून आपण बजाज फायनान्स कंपनीच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. शून्य टक्के व्याजदराने 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादी पोलीस पाटील यांच्याकडून 3 लाख 67 हजार रुपये आणि त्यांचे मित्र गुरुलिंगय्या स्वामी यांच्याकडून तीन लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर भरण्यास सांगितले.

फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्यांचे कर्ज मंजूर न करता तसेच खात्यावर भरलेले पैसे परत न करता विश्वासघात करून 6 लाख 67 हजारांची आर्थिक फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.