‘हिरकणी’ चित्रपटाला थिएटर दिले नाही, तर काचा फुटणार; मनसेचा खळखट्याकचा इशारा

0
951

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – हिरकणी या आगामी मराठी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा  इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे तर अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात बुधवारी ( दि. २३) मनसे कार्यकर्ते थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. ‘मराठी चित्रपटाला स्क्रीन देण्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे,’ असा इशारा मनसेने दिला आहे.

उत्तम कथानक, तगडी स्टारकास्ट या सर्व गोष्टींमुळे मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. परंतु अनेकदा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही चित्रपटगृह उपलब्ध होणे कठीण होते. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध नसल्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती.