हिंजवडी, भोसरी परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

0
205

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – हिंजवडी, भोसरी आणि एमआयडीसी भोसरी परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सोमवारी (दि. 19) हिंजवडी, भोसरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंजवडी येथील अपघात प्रकरणी पोलीस नाईक माणिक दराडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर पांडुरंग वरुटे (वय 37, रा. वरुटेगल्ली, आरेगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत वरुटे सोमवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर हिंजवडी येथे रस्त्याने पायी चालत जात होते. त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यामध्ये वरुटे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

एमआयडीसी भोसरी येथील अपघातात रमेश रामदास वडाळकर (वय 51, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय नारायण बढे (रा. लांडगेआळी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र रामदास वडाळकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सोमवारी दुपारी साडेतीन ते चार वाजता संकल्प वजन काटा, एमआयडीसी भोसरी येथे मयात रवींद्र पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने (एम एच 14 / जी डी 8556) भरधाव वेगात येऊन रवींद्र यांना धडक दिली. त्यामध्ये रवींद्र यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी येथील अपघातात पोलीस नाईक दिनेश साबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात आनंद सोमांना पुजारी (वय 32, रा. आळंदी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 27 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता मयत आनंद त्याच्या दुचाकीवरून (एम एच 14 / डी के 7393) पिंपळेगुरव कडून कासारवाडी रेल्वे स्टेशनकडे जात होता. भरधाव वेगात दुचाकी चालवून आनंद याने कासारवाडी येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या एका लोखंडी कचराकुंडीला जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या आनंद याचा मृत्यू झाला. स्वतःच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.