हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश जांभूळकर

0
312

हिंजवडी,दि.१०(पीसीबी) – आयटीनगरी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी म्हातोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे गणेश बन्सीलाल जांभूळकर यांची तर उपसरपंचपदी मनीषा जयसिंग हुलावळे यांची १५ विरुद्ध २ अशी बहुमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार डोंगरे यांनी या दोघाच्या नावांची घोषणा केली. यावेळी सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनी काम पाहिले.

हिंजवडीतील सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पॅनलमध्ये निवडून आलेल्या १५ जणांमध्ये पहिले पद कुणाला यावरून मोठी चुरस होती. मात्र गावातील जाणकार मंडळी एकत्र येत हे पद टप्या-टप्याने प्रत्येकाला दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात हिंजवडी ग्रामपंचायतीचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्याची शपथ सर्व सदस्यांनी घेतल्याने एक नवा अध्याय हिंजवडीच्या राजकारणात पाहायला मिळाला.

सरपंच-उपसरपंच पदासाठी प्रत्येकी तीन तीन अर्ज आले होते, त्यापैकी शिवनाथ जांभुळकर यांनी माघार घेतल्याने गणेश जांभुळकर आणि मयूर साखरे यांच्यात गुप्त मतदान घेण्यात आले. तर उपसरपंच पदासाठी मनीषा जयसिंग हुलावळे, रेखा संदीप साखरे व आरती वैभव बेंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले त्यापैकी रेखा साखरे यांनी माघार घेतल्यावर मनीषा हुलावळे व आरती बेंद्रे यांच्यात गुप्त मतदान घेऊन हुलावळे यांना १५, तर बेंद्रे यांना केवळ २ मते मिळाली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, सुरेश निकाळजे, केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाचे सदस्य शांताराम जांभूळकर, युवा नेते सुरेश हुलावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य संतोष साखरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत साखरे, माजी सरपंच मल्हारी साखरे, शामराव हुलावळे, तानाजी हुलावळे, राहुल जांभुळकर, दिलीप हुलावळे, माजी सदस्य भीमराव जांभुळकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजी जांभुळकर, उमेश साखरे, प्रदीप साखरे, सूर्यकांत साखरे आदी उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमली होती. यावेळी ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेत सर्वानी भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला.