हिंजवडी आयटीपार्कच्या कुंपणावर बिबट्याची दहशत पसरली आहे

0
378

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) – . गेल्या वर्षी नेरे येथील शेतकऱ्याच्या दोन वासरांना बिबट्याने ठार केले, तर कासारसाईत शेळ्या, मेंढ्यांसह पाच कोंबड्या फस्त केल्याची घटना ताजी असताना आज सोमवारी (दि. 24) सकाळी पुन्हा नेरे येथील उसाच्या फडात बिबट्याच्या मादी जातीचे तीन बछडे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेरे गावातील शेतकरी मोहन जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी करताना विठ्ठल पालवे या कामागराला हे बछडे आढळले. जाधव यांनी तत्काळ माहिती वनविभाला कळविली.

त्यानुसार घटनास्थळी पौड, मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडुरंग कोपणर यांच्यासह प्राणी मित्र शेखर जांभूळकर, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोरटे, राहुल जाधव, अनिमल रेस्क्‍यू टीम, चाइल्ड अनिमल ऍण्ड स्नेक प्रोटेक्‍शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक दाखल झाले.वन अधिकारी व रेस्क्‍यू टीमने हे बछडे ताब्यात घेतले असून लोकांची गर्दी टाळण्यासाठी वनपरीक्षेत्र कार्यालयात अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ठेवली आहेत. हे बछडे 15 दिवस ते महिनाभर वयाची असावीत, असा अंदाज वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी व्यक्त केला. या बछड्यांना त्यांच्या आईची व मायेची गरज आहे. त्यामुळे जेथे बछडे सापडले आहेत, त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे बिबट्या मादी त्या बछड्यांना घेऊन जाईल. त्या मादीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे वनक्षेत्राधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले