स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत ‘यांनी’ उतरवले आहे – रुपाली चाकणकर

0
233

पुणे,दि.२९(पीसीबी) – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला आहे.

“चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, असे मत व्यक्त केले. एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. नाहीतर कशाला 105 आमदार घेऊन घरी बसावं लागलं असतं. त्यामुळे एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी, अशक्य ते शक्य करुन दाखवले त्याला एक वर्ष झालं. अजून काही स्वप्नं आहेत ते साकार होताना चंद्रकांत दादा तुम्हाला पाहायची आहेत. आपली वैफल्यग्रस्त, नैराश्यजनक मानसिकता आम्ही समजू शकतो, आपणच सत्तेत येण्याची दिवा स्वप्नं पाहायची सोडून विरोधात आहोत हे सत्य स्वीकारावं” असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला.

दरम्यान “पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्या स्वप्नात आहेत का?” असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो किंवा इतर विषय, हे सरकार कशाबद्दलच खात्री देत नाही” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.