“स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी फक्त ‘एवढंच’ करा”

0
291

पुणे,दि.१३(पीसीबी) – ‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे (म्हाडाचा विभागीय घटक) यांच्यावतीने 2 हजार 890 सदनिकांच्या लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचं उद्घाटन आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांनी या योजनेचे ऑनलाईन उद्घाटन केले. गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (सर्वजण ऑनलाईन पध्दतीने) आदी उपस्थित होते.

दरम्यान उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ‘म्हाडा’च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना माफक दरात दर्जेदार व हक्काची घरे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ‘म्हाडा’ची सोडत प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये. जर कुणी असा प्रयत्न केला तर त्याच्याविरुद्ध तक्रार करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.