“स्मार्ट सिटी सायबर हल्लाप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा”- खासदार श्रीरंग बारणे यांची आयुक्तांना सूचना

0
257

पिंपरी, दि.12 (पीसीबी) – महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर हँकर्सने सायबर हल्ला करून कार्यालयातील 27 सर्व्हरमधील डाटा एन्क्रिप्ट करून चोरी झाल्याने सुमारे 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सायबर हल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना केली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशातील काही शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचे निश्चित केले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर हँकर्सने सायबर हल्ला करून कार्यालयातील सर्व्हरमधील डाटा एन्क्रिप्ट करून चोरी झाली आहे.

स्मार्ट सिटीच्या कामाचा ठेका टेक महिंद्रा या कंपनीला देण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीने पोलीसात तक्रार देवून रॅन्समवेअर हल्ला करून चीन, रशिया फ्रान्स जर्मनी या देशातून कोणी अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. दुसरीकडे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सर्व्हमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करून महत्त्वाचा डाटा इनिक्रप्ट केल्याचे सांगितले. त्यासाठी पैशाची मागणी केले असल्याचे म्हटले जाते. अशा प्रकारे विसंगत विधाने करून पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेची दिशाभूल केली जात आहे.

या प्रकरणामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत काम करणाऱ्या कंपनीबरोबर महापालिकेतील अधिकारी यांचे संगनमत असण्याची शक्यता आहे. तसेच टेक महिंद्र कंपनीने या कामासाठी सब ठेकेदार नियुक्त केले आहेत. कोट्यवधी रूपये खर्च करूनही महापालिकेचा डाटा भविष्यात सुरक्षीत राहील किवां नाही यातही शंका आहे. अशा प्रकारे एखाद्या कंपनीस काम देताना. त्या संबंधितील कागद पत्रांची पुर्तता करून घेणे हे स्मार्ट सिटी अतंर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

स्मार्ट सिटीचे अधिकारी व ठेकेदार कंपनी बेजाबदारीने काम करत असून त्यांचे आर्थीक हितसंबंध असल्याचे वाटते. अशा प्रकारे चाललेल्या गलथान कारभार, त्यात दोषी असणाऱ्या ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.