‘स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांना दिल्लीत प्रतिनियुक्तीसाठी ग्रीन सिग्नल’

0
703

– स्मार्ट सिटीतील घोटाळे अंगाशी यायला नकोत म्हणून पोमण पळ काढत असल्याची चर्चा

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – तब्बल २६ वर्षे महापालिका सेवेत असलेले आणि सद्या स्मार्ट सिटी लिमिटेडचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे जेष्ठ अधिकारी निळकंठ पोमन यांना प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संचालक जाण्यास महापालिका प्रशासनाने ग्रीन सगिनल दिला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी त्याबद्दलचे पत्र नुकतेच निळकंठ पोमन यांना दिले आहे. दरम्यान, पोमन हे तीन वर्षे स्मार्ट सिटीचा काराभार सांभाळत असून आता या प्रकल्पात प्रचंड मोठा घोटाळा असल्याचे आरोप सुरू झाल्याने आपल्यावर कुठलेही सकट नको म्हणूनच ते पळ काढत महापालिका सोडून चालले आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा माहिती आणि तंत्रज्ञान विभाग स्वतः निळकंठ पोमण सांभाळतात. १९९५ पासून ते महापालिका सेवेत आहेत. अगदी सुरवातीला स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश नव्हता.
तिसऱ्या फेरीमध्ये शहर स्मार्ट सिटी मध्ये आले आणि त्यासाठी पोमण यांनी पाठपुरावा केला, असा दावा ते करतात. स्मार्टी सिटी योजनेतून २०१७ पासून सुमारे ५०० कोटी रुपये महापालिकेला मिळाले. या योजनेतून शहरात हजारो कोटींची विविध कामे सुरू आहेत. दरम्यानच्या काळात २५ मार्च २०२१ रोजी पोमण यांनी आपल्याला स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अथिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याची विनंती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी हा आपल्याकडील अतिरिक्त पदभार आहे, त्यातून कार्यमुक्त करा, अशी विनंती पोमन यांनी केली आहे. विशेष म्हणजे या त्यांच्या अर्जावर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (प्रशासन), सह आयुक्त (प्रशासन) या सर्वांनी तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र दिले. आयुक्त राजेश पाटील यांनी पोमण यांच्या आजवरच्या कार्याबद्दल विशेष कौतुक केले आहे. पोमण हे प्रतिनियुक्तीवर जाणार असातना लेखा विभागानेही त्यांचे कोणतेही देणे घेणे नाही असा शेरा देऊन त्यांना मोकळे केले आहे. त्यामुळे पोमण यांचे जाणे ही आता फक्त औपचारिकता राहिली आहे.

दरम्यान, पोमण यांच्या निर्णयाबद्दल संशयाचे काहूर माजले आहे. स्मार्ट सिटी मध्ये ५०० कोटींचे टेक महिंद्रा, २५० कोटी रुपयेंचे केबल टाकणे, १११ कोटींचे संगणकीकरण, ४० कोटींचे ई लर्निंग आणि त्याशिवाय हजार कोटींची रस्ते, पूल आदी मिळून दोन हजार कोटींची कामे सुरू आहेत. आजवर या कामांचे सुमारे ७० टक्के पैसे अदा करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, स्मार्ट सिटीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून चौकशी कऱण्याची मागणी करणारे अनेक अर्ज आले आहेत. आजवर गेल्या दोन वर्षांत नेते, कार्यकर्ते, माहिती आधिकार कार्यकर्ते अशा सर्वांचे मिळून १३ अर्ज आले आहेत. एकाही अर्जावर चौकशी झालेली नाही. धक्कादायक प्रकार म्हणजे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही स्मार्ट सिटी मध्ये घोटाळा झाल्याची पुराव्यासह तक्रार केली असून त्याचीही चौकशी प्रलंबित आहे. पंतप्रधानांचे पीएम पोर्टलवरही घोटाळ्यांबद्दल तक्रार अर्ज आले आहेत. महापालिका प्रशासनाने एकाही अर्जावर अद्याप चौकशी केलेली नाही, अशी माहिती मिळाली.

निळकंठ पोमण यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, दिल्ली येथील केंद्र सरकारच्या संस्थेत संचालक पदासाठी मला अर्ज करायचा आहे म्हणून कार्यमूक्त करण्याठी मी विनंती केली होती. महापालिका आयुक्तांनी त्याला संमती दिली आहे. १९९५ पासून महापालिका सेवात आहे, आता मोठा अनुभव घेण्यासाठी प्रतिनियुक्तीवर तीन वर्षांसाठी जायचा विचार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अनेक अधिकारी यापूर्वी अशा प्रकारे प्रतिनियुक्तीवर गेल्याचे दाखले आहेत. स्मार्ट सिटीबद्दल कोणताही आक्षेप आला तरी आम्ही सदैव तयार आहोत. यापूर्वी जेएनएनयूआरएम चा मोठा अनुभव आहे. अगदी कॅगची चौकशी आली तरी आपण केव्हाही त्याला सामोरे जाऊ. महापालिकेला आजवर जे काही पुरस्कार मिळाले त्यात माझा सहभाग होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सीएसआर मधून मी २४ कोटी रुपये मिळवून दिले आता दुसऱ्या लाटेत ७-८ कोटी गोळा केले. स्मार्ट सिटी घोटाळा वगैरे कोण काय म्हणते याला महत्व नाही, कारण मी जे जे काम केले आहे, त्याचे सर्व निर्णय हे संचालक मंडळाने घेतलेले आहेत. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मला जर का अधिक चांगली संधी मिळत असेल तर त्यासाठी प्रयत्न करणे यात गैर काहीच नाही.