स्थायी समितीचा शेवटच्या सभेतही धमाका! 179 कोटी रुपये खर्चाला मान्यता

0
553

पिंपरी दि. २८ (पीसीबी) – मागील दहा सभांमध्ये 1 हजार कोटींहून अधिक विकास कामांच्या खर्चांना मान्यता देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने आज (सोमवारी) झालेल्या शेवटच्या सभेतही धमाका केला. तब्बल 179 कोटी 9 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. त्यामध्ये औषध खरेदी, पाणीपुरवठा, डांबरीकरण, पीएमपीएलची संचलन तुट अशा विषयांचा समावेश आहे.  

 पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया झाली नाही. कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे  निवडणूक लांबणीवर गेली. त्यामुळे स्थायी समितीला पूर्ण कालावधी मिळत आहे. स्थायी समितीच्या 8 सदस्यांचा कालावधी आज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आजची सभा शेवटची होती. या सभेत किती कोटींच्या विकास कामांना मंजुरी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. स्थायीची आजची सभा सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन झाली. नितीन लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषय पत्रिकेवरील एकूण 36 विषयांपैकी 35 विषय आणि ऐनवेळचे 50 विषय अशा एकूण 85 विषयांना या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी येणा-या 179 कोटी 9 लाख 76 हजार रुपयांच्या विकास कामांना स्थायी समितीने मान्यता दिली. त्यात पीएमपीएमएलला 27 कोटी 54 लाख रुपये संचलन तूट देण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका दवाखाने, रुग्णालयांसाठी आवश्यक असणारे अॅलोपॅथिक औषधे, साहित्य खरेदीसाठी येणा-या 21 कोटी 94 लाख 47 हजार 661 रुपये,  प्रभाग क्रमांक 17 मध्ये बिर्ला हॉस्पिटल ते वाल्हेकरवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजुला फुटपाथ व सायकल ट्रॅक विकसित करणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामासाठी येणा-या 2 कोटी 65 लाख रुपये, महापालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्र निघोजे तळवडे व जलशुद्धीकरण केंद्र चिखली येथील प्रकल्पाकरिता उच्चदाब पाणीपुरवठा घेण्याकरिता विद्युत विषय कामे करण्याअंतर्गत तळवडे येथील नदीजल उपसा केंद्राकरिता वीजपुरवठा करण्यासाठी 22 केव्ही भूमिगत वीजवाहिनी टाकणे व अनुषंगिक अतिरिक्त कामे करण्यासाठी येणा-या 1 कोटी 50 लाख रुपये, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षणापोटीचा पुर्नस्थापना खर्चाचा दुसरा हप्ता देण्यासाठी 35 कोटी 55 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली.

कै. अण्णासाहेब मगर येथील जम्बो कोविड रुग्णालय येथील मे. मेडब्रोज हेल्थकेअर डायग्रोस्टिक सेंटरच्या कर्मचा-यांचे राहण्याचे आणि जेवणाचे बिल अदा करण्यासाठी येणा-या 2 कोटी 51 लाख 97 हजार रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली. महापालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक छपाई साहित्य दर करार पद्धतीने एक वर्ष कालावाधीसाठी छपाई करुन पुरवठा करण्यासाठी येणा-या 1 कोटी 8 लाख, महापालिकेच्या क्रीडा विभागास आवश्यक विविध ओपन जीमसाठी साहित्य खरेदी करण्याकरिता येणा-या 2 कोटी 81 लाख 39 हजार रुपये अशा 179 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली आहे.

स्थायी समितीचा कारभार 13 मार्चपर्यंत 8 सदस्यच करणार!

स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष भाजपचे नितीन लांडगे, सुजाता पालांडे,  सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे शिवसेनेच्या मीनल यादव आणि अपक्ष आघाडीच्या नीता पाडाळे यांना 13 दिवसांचा वाढीव कालावधी मिळला आहे. लांडगे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीलाच संपत आहे. स्थायी समिती बरखास्त होत नाही. त्यामुळे 1 मार्चपासून आठ सदस्यच स्थायी समितीचा कारभार करणार आहेत. सर्व सदस्य मिळून एकाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करतील. 13 मार्चपर्यंत स्थायी समितीच्या दोन सभा होऊ शकतील.