‘सोहम’सारखे युवा देशाच्या उज्वल भारताचे भवितव्य – प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील

0
329

– चमकत्या हिऱ्यांचा शोध घेण्यात ‘युवा मोर्चा-युवा वॉरियर्स‘ अग्रेसर – प्रदेश संयोजक अनुप मोरे..

– शिरूरच्या ‘सोहम’चा ‘युवा मोर्चा-युवा वॉरियर्स’ कडून सन्मान; ५१ हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस..

पुणे, पुणे, दि.०५ (पीसीबी) : शिरुर तालूक्यातील तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सोहम सागर पंडित या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कमी वजनाचे १०० उपग्रह भारतीय पद्धतीने तयार करून, ते थेट अवकाशात सोडण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या चिमुकल्याने तयार केलेल्या या प्रकल्पाची अखिल विश्वाने दखल घेतली असून अनेक विश्वविक्रमांची नोंद त्याच्या नावावर झाली आहे. त्याच्या या कार्याला आमचा मानाचा सलाम, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांनी केले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस इंडियामार्फत आयोजित स्पर्धेत ‘सोहम’ ने मोठे यश मिळवीत आपल्या गावासह देशाचे नाव उंचावले. त्याच्या कार्याचा ‘भारतीय जनता युवा मोर्चा – युवा वॉरियर्स’ कडून सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व युवा वॉरियर्स’ प्रदेश संयोजक तथा भाजयुमोचे उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या हस्ते ‘सोहम’ ला ५१ हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गणेश कुटे, पंडित भुजबळ, हर्षल विभांडिक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर पंडित, सचिन खोले आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असणाऱ्या ‘सोहम’ ने जगातील सर्वांत कमी २५ ते ८० ग्रॅम वजन असणारे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर साइंटिफिक हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित केले. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशाला गवसणी घालणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. ‘युवा मोर्चा-युवा वॉरियर्स’ यापुढील त्याच्या प्रत्येक प्रयोगाला चालना देण्यासाठी नेहमीच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. अशा चमकत्या हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांना घडविण्यासाठी युवा मोर्चा-युवा वॉरियर्स’ नेहमची अग्रेसर असेल, असेही ते म्हणाले.

अनुप मोरे म्हणाले, सोहमच्या या अतुलनीय कार्याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, असिस्टंट वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये झाली आहे. शिरूर तालुक्याचे नाव इतर देशांमध्ये पोहचविणारा तो सर्वात कमी वयाचा अलविया ठरला आहे. त्याच्या या यशाने निश्चितच आपल्या देशाला शास्त्रीयदृष्ट्या मोठा फायदा होईल. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.