सेकंड हॅन्ड कार खरेदी करून देण्याच्या बहाण्याने अभियंत्याची दोन लाखांची फसवणूक

0
261

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – सेकंड हॅन्ड कार खरेदी करून देतो, तसेच त्या कारला काही नवीन पार्ट टाकून देतो, असे अमिश दाखवून अभियंत्यांकडून एक लाख 91 हजार 500 रुपये घेतले. पैसे घेऊन चार महिने उलटल्यानंतरही कार खरेदी करून न दिल्याने अभियंत्याने फसवणुकीची फिर्याद दिली आहे. ही घटना 16 डिसेंबर 2019 ते 19 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली आहे.

गगनदीप सुधीर तलवार (वय 28, रा. हिंजवडी. मूळ रा. राणीबाग नवी दिल्ली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अर्णव चव्हाण (रा. वाघोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. आरोपी अर्णव याने फिर्यादी तलवार यांच्याशी ओळख करून मैत्री केली. तलवार यांचा विश्वास संपादन करून एम एच 12 / इ एक्स 1143 ही होंडा सिव्हिक कार खरेदी करून देतो आणि त्याला कारला नवीन पार्क टाकून देतो, असे अमिश दाखवले. त्यासाठी त्याने एक लाख 92 हजार रुपये रक्कम मागितली.

तलवार यांनी 16 डिसेंबर 2019 ते 19 फेब्रुवारी 2020 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून आरोपीच्या खात्यावर एक लाख 91 हजार 500 रुपये ट्रान्स्फर केले. पैसे मिळाल्यानंतर चार महिने उलटून देखील अर्णव याने फिर्यादी यांना कार खरेदी करून दिली नाही. याबाबत तलवार यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.