सुपर लीग खो-खो स्पर्धेत पॅंथर्स, पहाडी बिल्लाज विजेते

0
249

नवी दिल्ली, दि.१७ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकरच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पहाडी बिल्लाज संघाने केकेएफआय 2021 खो खो सुपर लीग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्यांनी पँथर्स संघावर सहा गुणांनी विजय मिळवला. महिला गटात मात्र सर्वाधिक विजयासह पॅंथर्सने विजेतेपदावर मोहोर उमटवली.

इंदीरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत कर्णधार वाईकरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाने 31-25 असा विजय मिळवला. वाईकरने संपूर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. त्याने बचावात एक मिनिट व 50 सेकंद पळती केली. त्याचे आक्रमणही धारदार राहिले. त्याने 11 गडी टिपले. त्याला रेल्वेच्या निलेश पाटील आणि केरळच्या महेश एम. यांनी चांगली साथ दिली. महेशने एक मिनिट आणि 40 सेकंद बचाव केला तर, निलेशने सहा गुणांची कमाई केली.

केकेएफआय आणि अल्टिमेट खो खो (यूकेके) यांनी प्रथमच वैज्ञानिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्याला अनुसरून घेण्यात आलेली ही स्पर्धा खेळाडू मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग आहे. पुरुष संघातील विजेत्या आणि उपविजेत्या संघास अनुक्रमे 2 लाख व 1.50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर, तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात आले. तर, महिला संघांना प्रत्येकी 30 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. पश्चिम बंगालचा सुभाशिष संतराने पँथर्स संघाकडून महत्त्वाची कामगिरी केली. त्याने बचावात 1 मिनिट 50 सेकंद वेळ देत नंतर आठ गुणांची कमाई केली.

महाराष्ट्रच्या तीन खेळाडूंना स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. सोलापूरचा रामजी कश्यपला सर्वोत्तम आक्रमक आणि ठाण्याच्या महेश शिंदेला सर्वोत्तम बचावपटूचा पुरस्कार मिळाला. त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम वजीर पुरस्कार आणि 75 हजार रुपयांचे बक्षीस कोल्हापूरच्या अभिनंदन पाटीलला मिळाले आणि आंध्रप्रदेशच्या पी सिवा रेड्डीला सर्वोत्तम पोल डायवर म्हणून 50 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम स्कायडाईव्हकरता मध्यप्रदेशच्या सचिन भारगो याला 50 हजार रुपये बक्षीस देण्यात आले.

महिला स्पर्धेत पँथर्स संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. त्यांनी शेवटच्या दिवशी चिताज विरुद्ध नऊ गुणांनी विजय मिळवला. त्यांचा हा सलग चौथा विजय आहे. त्यामुळे त्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. त्यापूर्वी पुरुष गटाच्या उपांत्यफेरीच्या लढतीत पँथर्स संघाने जगुअर्स संघाला 43-35 असे आठ गुणांनी तर, पहाडी बिल्लाजने चिताजला(41-34) दुसऱ्या लढतीत सात गुणांनी पराभूत केले.