सुजय विखे-पाटील राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा लढवणार ?

0
784

पुणे, दि. ५ (पीसीबी) –  अहमदनगरच्या लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सुजय विखे पाटील यांचा  येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे  सुजय राष्ट्रवादीच्या तिकीटावर अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.    

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये राज्यातील ४८ जागा लढवण्याबाबत एकमत झाले होते. मात्र, अहमदनगरच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आता याच जागेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत आहे. यानुसार  सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात विखे- पाटील आणि पवार कुटुंबातील वैर सर्वश्रुत आहे. यामुळे अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नव्हती.  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडल्याची चर्चा सुरु होती. मात्र, काँग्रेससाठी ही जागा सोडली नसल्याचे सांगून  या जागेवर राष्ट्रवादीच लढणार,  असे अजित पवार यांनी  म्हटले होते.