“सायबर हल्ल्याच्या आड ‘५ कोटीं’चा विमा लाटण्याचा डाव”- जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांचा आरोप

0
607

पिंपरी, दि.१५ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पावर सायबर हल्ल्याचा प्रकार नुकताच झाला आहे. टेक महिंद्रा कंपनीने आपले ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. नुकसान नेमके कसे झाले? त्याबाबत सायबर हल्ला झाल्यापासून गेले तीन आठवडे त्याचा समाधानकारक खुलासा कंपनीला करता आलेला नाही. त्यामुळे “नुकसानीची रक्कम ५ कोटी रुपयेंची दाखवून टेक महिंद्रा कंपनी विमा लाटण्याचा डाव करत आहे”, असा आरोप जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे.

“महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पावरील सायबर हल्ला, त्यानंतर टेक महिंद्रा कंपनीने पोलिसांत दाखल केलेली तक्रार, महापालिकेचे स्पष्टीकरण अशा सर्व घडामोडी पाहता हे सर्व प्रकरण खूपच गोलमाल असून त्यात कुठेतरी पाणी मुरते आहे”, असे सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करताना या प्रकरणात ५ कोटींचा विमा लाटण्यासाठीच हा बनाव नाही ना याचीही सखोल चौकशी करावी,” अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी पत्रात केली आहे.

आयुक्त पाटील यांना दिलेल्या पत्रात सीमा सावळे म्हणतात कि, “स्मार्ट सिटी प्रकल्प सांभाळणार्‍या टेक महिंद्रा कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्व्हर्स खंडणीच्या हल्ल्याचा बळी पडले आहेत. तक्रारीनुसार हल्लेखोरांनी बिटकॉइन्समध्ये खंडणी द्यावी, अशी मागणी केली आहे. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हा हल्ला झाला. या संदर्भात ९ मार्च रोजी निगडी पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेक महिंद्रा कंपनीने आपले ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. दुसरीकडे महापालिकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असाही युक्तीवाद महापालिका प्रशासनाने केला आहे. हे सर्वच गोलमाल आणि परस्पर विसंगत वाटते आहे.”

“महापालिकेची बाजू स्पष्ट करताना कोणताही संवेदनशील डेटा लीक झाला नाही, असेही प्रशासनाने प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. अशा परिस्थितीत कंपनीने पाच कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज नेमका कोणत्या आधारावर केला, त्याची वांरवार मागणी करूनही खुलासा झालेला नाही. सायबर हल्ला झाल्यापासून गेले तीन आठवडे आजवर त्याचा उलगडा कंपनीला करता आलेला नाही. अशा परिस्थितीत ५ कोटींचे नुकसान झाल्याचा कंपनीचा दावा हा फोल वाटतो. निव्वळ विमा लाटण्यासाठीच हा ५ कोटींचा दावा केला असावा,” असा दाट संशय सीमा सावळे यांनी व्यक्त केला आहे.

“टेक महिंद्रा कंपनीच्या या खोटारड्या प्रवृत्तीमुळे सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य लोकांसमोर आणले पाहिजे. शहराच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशी माहिती या कंपनीच्या ताब्यात आहे. डेटा सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी कंपनीची आहे. सायबर हल्ला याचाच अर्थ कंपनीने पुरेशी सुरक्षा यंत्रणा बाळगलेली नाही. टेक महिंद्रा कंपनीचा हा बेजबाबदारपणा आहे. केवळ विमा लाटण्यासाठीच सायबर हल्ल्यानंतरचा हा बनाव आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे महापालिकेचे प्रशासन कंपनीला उघड उघड पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकूणच स्मार्ट सिटीच्या कारभाराबाबत संशयाचे धुके निर्माण झाले आहे,” असा आरोप सीमा सावळे यांनी केला आहे.

“सायबर हल्ल्याची जबाबदारी टेक महिंद्रा कंपनीची आहे तशीच स्मार्ट सिटीचा कारभार पाहणाऱ्या प्रमुख अधिकारी निळकंठ पोमण यांचीसुध्दा तितकीच आहे. त्यांच्याकडूनही या प्रकरणावर कंपनीचीच वकिली केली जाते, हे खूपच धक्कादायक आणि संशयास्पद आहे. आयुक्त साहेब आपण स्वतः जातीने यात लक्ष घालून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी सीमा सावळे यांनी पत्रात केली आहे.