सायबर हल्ला प्रकऱणात टेक महिंद्रा कंपनीचा एकदम यू-टर्न, कंपनी म्हणते…’पाच कोटींचे नुकसान झालेच नाही’

0
608

– सायबर हल्ल्याच्या निमित्ताने पाच कोटींचा विमा लाटण्याचा डाव जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी उधळला

– पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे दिली प्रांजळ कबुली

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हर वर सायबर हल्ला झाल्याची घटना अडिच महिन्यापूर्वी उघडकिस आली. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्वरमधून डेटा इनक्रिप्ट करण्यात आला होता आणि तो हवा असल्यास बिटकॉइनची मागणी हॅकर्सने केली होती. या सायबर हल्ल्यात सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा महापालिकेच्या वतीने काम पाहणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने पोलिस तक्रारीत केला होता. महापालिका प्रशासनाने त्यानंतरही शांत राहणेच पसंत केले होते. या एकूण प्रकऱणात सायबर हल्ल्याच्या निमित्ताने ५ कोटी रुपयेंचा विमा लाटण्याचा डाव असल्याचा संशय जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी व्यक्त केला होता. सर्व प्रकऱणाची सखोल चौकशी कऱण्याची मागणी सिमा सावळे यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि नंतर महापालिका आयुक्तांनी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस काढली होती. सायबर हल्ल्यामागची वस्तुस्थिती काय आहे त्याबाबत त्यांनी कंपनीला विचारणा केली होती. सुरवातीला पोलिस तक्रार दाखल करताना, सायबर हल्ल्यामुळे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कऱणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने आता मात्र महापालिकेला दिलेल्या पत्रात अगदी यू टर्न घेतला आणि पाच कोटी रुपयांचे नुकसान झालेलेच नाही, अशी प्रंजळ कबुलीच दिली आहे. दरम्यान, सुरवातीला ५ कोटींच्या नुकसानीचा दावा कऱणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने आता अचानक पलटी मारल्याने एकूण प्रकऱणाबद्दलचा संशय अधिक बळावला आहे.

सायबर हल्ला करून माहिती चोरल्यामुळे ५ कोटींचं नुकसान झाल्याचा दावा टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. चोरी केलेला डेटा परत मिळवला जाऊ शकतो, असं सायबर पोलिसांनी त्यावेळी सांगितलं होते. हॅकरने हा डेटा इनक्रिप्ट केला असून तो पुन्हा त्यांनाच डिइनक्रिप्ट करता येतो. त्यामुळे ते बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी करत आहेत, असं पोलिसांनी त्यावेळी म्हटलं होते. या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तब्बल १० दिवसांनंतर दिलेल्या तक्रारी नंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली होती. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार, हा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी घडला आणि या प्रकरणी दहा दिवसांनी तक्रार देण्यात आली. त्यानंतर घटना उजेडात आली. मात्र, तक्रार देण्यास विलंब का झाला, या बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण कायम आहे. या सर्व प्रकारामुळे तब्बल ५ कोटींचे नुकसान झाल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद केले होते. त्यामुळे नेमका कोणता आणि किती महत्वाचा डेटा इन्क्रीप्टकेला गेला याची पूर्णतः माहिती गुलदस्त्यात होती.

दरम्यान, जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी या प्रकऱणावर लख्ख प्रकाश टाकणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नेते आणि नगरसेवकांनी या विषयावर महापालिका आयुक्त राजे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी कंपनीला नोटीस दिली. या घटनेचे मूळ कारण काय ते स्पष्ट करावे. या सायबर हल्ल्याच्या आड ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा बनाव करुन विमा लाटण्याचा डाव असल्याची शंका नगरसेविका सिमा सावळे यांनी व्यक्त केली होती. सावळे यांच्या पत्राची दखल घेत अखेर आयुक्त राजेश पाटील यांनी या घटनेत नेमके आर्थिक नुकसान कोणते, किती व कसे याचा तपशिल टेक महिंद्रा कंपनीकडून तीन दिवसात मागविला होता. टेक महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या भागीदार कंपन्या (क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि.) यांनी ५ वर्षाच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि ऑपरेशन ची जबाबदारी घेतली आहे. करारातील अटी-शर्ती त्यांच्यावर बंधनकारक आहेत. प्रत्यक्षात सायबर हल्ल्यात या अटी-शर्तींचा भंग झाल्याचे सिध्द झाले आहे, अशी तंबी आयुक्त राजेश पाटील यांनी पत्राद्वारे कंपनीला दिली. त्यानंतर कंपनीने सरिवस्तर खुलासा केला आहे.

स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुक्त राजेश पाटील यांना ५ मे रोजी टेक महिंद्रा कंपनीने एक सविस्तर पत्र दिले. त्यात ५ कोटी रुपयेंचे नुकसान झालेलेच नाही, असे स्पष्ट केले आहे. खुलासा करताना कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक (बिझनेस डेव्हलपमेंट) नितीन बिहनी म्हणतात, आम्ही पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यात ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दिला होता, पण प्रत्यक्षात त्यावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे मिळून निश्चित किती नुकसान झाले त्याची आम्हाला माहिती नव्हती. पोलिस तक्रारीत ५ कोटी रुपयेंचा अंदाज दिला होता, पण नुकसान किती झाले याचा निश्चित तपास केला असता तो फक्त २७ सर्वरवर परिणाम झाला आहे त्याच्या पुर्नबांधणी पूरता आहे, असे लक्षात आले. तब्बल दहा दिवस उशिरा दिलेल्या तक्रारीत ५ कोटींच्या नुकसानीचा दावा कंपनीने केला होता. कंपनीच्या या स्पष्टीकरणानंतर ५ कोटींच्या नुकसानीचा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे. केवळ विमा लाटण्यासाठीच ५ कोटींच्या नुकसानीचा दावा कंपनीने केला होता, असे जवळपास सिध्द झाले आहे.