साने चौकात कोयत्याचा धाक दाखवून हॉटेल व्यवसायिकाला लुटले

0
575

चाकण, दि. २४ (पीसीबी) – शस्त्रधारी गुंड हॉटेलात शिरले. त्यांनी हत्यारांचा धाक दाखवून हॉटेल व्यवसायिक आणि त्याच्या भावाला घाबरवले. तसेच हॉटेलच्या गल्ल्यातील ७ हजारांची रोख जबरदस्तीने काढून नेली. ही घटना रविवारी (दि.२१) रात्री बाराच्या सुमारास साने चौक, कस्तुरी मार्केट येथील महादेव प्युअर व्हेज या हॉटेलात घडली.

याप्रकरणी हिरामन समारामजी देवासी (वय ३४, रा. आद्रस निवास सोसायटी, रुम क्र. २०९, त्रिवेणीनगर) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहित चंद्रकांत जुजगर (वय २२, रा. साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली), दिनेश राम कोळी (वय २२, रा. रुपी हौसिंग सोसायटी रुपीनगर, तळवडे), तुकाराम म्हस्के, आकाश शिंगारे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिरामन देवासी यांचे साने चौक येथे महादेव प्युअर व्हेज नावाचे हॉटेल आहे. रविवारी रात्री हिरामन आणि त्यांचा भाऊ हॉटेलवर असताना सहा आरोपी तेथे आले. त्यांनी त्यांच्याजवळील कोयता, रॉड आणि काठ्यांचा धाक दाखवून हॉटेलच्या गल्ल्यातील ७ हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. पोलिसांनी याप्रकरणी रोहित जुजगर आणि दिनेश कोळी या दोघांना अटक केली आहे. इतर चार आरोपी सध्या फरार असून चाकण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.