सांगवीत तरुणीसोबत बोलल्याच्या कारणावरुन दोघांवर कोयत्याने वार

0
1413

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – तरुणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन तिघाजणांनी मिळून दोघा मित्रांवर कोयत्याने जबर वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार (दि.१७) सकाळी साडेदहाच्या सुमारास जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटीतील जनाई बंगल्यासमोर घडली. 

महेश सुभाष जाधव (वय १९, रा. पिंपळे निलख, गणेशनगर, घोरपडे यांची रुम सौरव अपार्टमेंट शेजारी) आणि त्याचा मित्र आदेश असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार, अमोल भोसले, अजय सावंत आणि शुभम कांबळे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी साडेदहाच्या सुमारास जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटीतील जनाई बंगल्यासमोर जखमी महेश आणि आदेश हे दोघे किरण आणि यशस्विनी सोबत बोलत उभे होते. यावेळी आरोपी अमोल, अजय आणि शुभम हे तिघेही तीथे आले. त्यांच्या हातात लोखंडी कोयते आणि बिअरची बाटली होती. आरोपी अमोलने मेहशला, “तु यशस्विनीसोबत का बोलतो”, असे म्हणून कोयत्याने हातावर आणि पंज्यावर वार केले. तसेच आरोपी अमोल याने त्याच्याकडील बीअरची बाटली आदेश याच्या डोक्यात फोडली तर आरोपी शुभम यांने त्याच्याकडील कोयत्याने आदेश याच्या खांद्यावर वार करुन गंभीर जखमी केले आणि पसार झाले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अमोल, अजय आणि शुभम या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सांगवी पोलीस तपास करत आहेत.