सांगवीत जबरदस्ती घरात घुसून तरुणीचा विनयभंग; तरुणीच्या घरच्यांना दिली जीवे मारण्याची धमकी

0
490

सांगवी, दि. ५ (पीसीबी) – शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन तरुणी राहत असलेल्या घराच्या काचा फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तरुणीचा विनयभंग करुन तिच्या आई-वडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. ३) रात्री साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॉन्टी जोसेफ पाटोळे (वय २२, रा. ढोरे नगर, जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जॉन्टी आणि फिर्यादी १७ वर्षीय तरुणी एकमेकांच्या घराशेजारी राहतात. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जॉन्टी याने तरुणी राहत असलेल्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून घरात प्रवेश केला. घरातील पाण्याचा माठ फोडून मुलीला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. हे भांडण सोडविण्यासाठी मुलीचा भाऊ आणि आजी मध्ये आले असता त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच मुलीच्या आई-वडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जॉन्टीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सांगवी पोलीस तपास करत आहेत.