सशस्त्र दरोडयाच्या गुन्हयातील दोघांना अटक

0
275

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी एमआयडीसी मधील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारून कंपनीत दरोडा घातल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना 12 तासाच्या आत अटक केली. दोन मुख्य आरोपींना अटक केली असून त्यांच्या पाच अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गणेश भुंगा कांबळे (वय 19, रा. निराधारनगर पिंपरी), आदित्य राम सुर्वे (वय 19, रा. भिमनगर पिंपरी मार्केट पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जालिंदर धोंडीबा रोडे (वय 68, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे पिंपरी एमआयडीसी मधील संदीप स्टील या कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे ते कामावर असताना दोन अज्ञात व्यक्ती कंपनीच्या बंद गेटवरून आत आले. त्यातील गण्या नावाच्या इसमाने फिर्यादी यांना कोयत्याने मारले. त्यानंतर त्यांना धमकावून खाली बसवले आणि अन्य साथीदारांना कंपनीचे गेट खोलून आत घेतले.

फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना आरोपींनी जखमी केले. हाताने व विटेने मारले. त्यांच्या खिशातून मोबाईल फोन आणि चार हजार 600 रुपये रोख रक्कम आरोपींनी काढून घेतली. त्यांनतर त्यांना धमकावून कंपनीतील मटेरियल आणि मशिनरी असा एकूण एक लाख 61 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या गुन्ह्यातील आरोपी पिंपरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दोघांना अटक केली. तर पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. आरोपींकडून पोलिसांनी दोन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी गणेश कांबळे याच्यावर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात खून, जबरी चोरी, चोरी, मालाविरुद्धचे असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.