सर्वात मोठ्या १२० फुटी रावण दहन कार्यक्रमासाठी पिंपळे सौदागर सज्ज…

0
240

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – विजयादशमी निमित्ताने मंगळवार ( दि.२४) रोजी सायं.६ वाजता नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक,नेक्सा शोरूम समोर पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्वात मोठ्या रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा विजयादशमी कार्यक्रम पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी आकर्षक ठरणार आहे. यासाठी यंदा १२० फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात येणार आहे.रावणाच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी दुपारपर्यंत पुतळा उभारण्यात येणार आहे. बांबू, काठ्या, सुतळी, पुठ्ठे, काथ्या, खिळे, दोरी आदी साहित्यांचा वापर करून रावणाची प्रतिकृती तयार केली जात आहे. 

या दिवशी उपस्थित सर्व नागरिकांना अनेक उपक्रम आणि विशेष अतिथींसह एक अविस्मरणीय अनुभव येणार आहे. संध्याकाळचे मुख्य आकर्षण दुसरे तिसरे कोणी नसून सुनील अनिल तिलकधारी, हिसार हे या उत्सवाचा भाग होण्यासाठी हरियाणातून प्रवास करून येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात टाईम पास -३ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे, तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया  देवधर आणि प्रसिद्धी दिग्दर्शक अभिनेते श्री प्रवीण तरडे या प्रमुख पाहुण्यांचा समावेश असेल. चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय या कार्यक्रमाचे अँकरिंग करणार आहेत. 

रावण एक विद्वान आणि त्याच्या काळातील सर्वात ज्ञानी माणूस होता. रावणाला  “दश मुख किंवा दशानन” असेही म्हटले जाते. रावणाची दहा डोकी दहा नकारात्मक प्रवृत्तीचे प्रतीक मानली गेली आहेत आणि ती प्रवृत्ती म्हणजे वासना,गर्व, अहंकार,मोह,क्रोध,लोभ,मत्सर, द्वेष आणि भय. दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावण वध म्हणजे सत्याचा असत्यावर विजय,अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. 

खरोखरच रावण एक असामाजिक प्रवृत्ती ,अहंकार आणि अज्ञानाचे प्रतिक,तसेच राक्षसी विचारधारा मानला जातो. जर दुष्ट विचार,कपट ,दुराचार इ. रावण प्रवृत्तीचे पुतळा दहन करायचे असेल तर आपण सर्व प्रथम आपल्या आत सामावलेल्या या प्रवृत्तीचे शमन केले पाहिजे. आपल्या आत सामावलेला जो खराखुरा रावण आहे त्याचे दहन केले पाहिजे. ज्यामुळे आपण तर सुखी होऊच पण त्याचबरोबर समाज आणि राष्ट्र ही सुखी आणि समाधानी राहील. बाहेरच्या रावणाचे दहन करायचे आणि आपल्या आत सामावलेला रावण तसेच जिवंत ठेवायचा अशी मनोवृत्ती असेल तर रामराज्य येणार कसे? जर आज आपण रावणाच्या पुतळ्याचे दहन करत आहोत तर सर्वात प्रथम अज्ञान, दहशतवाद आणि अहंकाराच्या पुतळ्याचे दहन करायला हवे आणि सत्य, ज्ञान, निर्भयता आणि सुखाच्या जीवनावर विजय मिळवायला हवा.