सध्या जे सुरू आहे, त्याला उत्तर कसे द्यायचे हे चांगलेच ठाऊक – शरद पवार

0
738

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पक्षांतर हे सर्व आम्ही अनुभवले आहे, त्याला कसे उत्तर द्यायचे हे ही आम्हाला ठाऊक आहे आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याची ही आम्हाला काळजी आहे,  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) येथे म्हटले आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांच्या पक्षांतरावर भाष्य केले.

यावेळी ते म्हणाले की, माझ्या दृष्टीने सध्या काही विशेष घडत नाही. पक्षांतराचे म्हणायचे तर मला याची थोडीही चिंता वाटत नाही. सध्या भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. मात्र याला उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला ठाऊक आहे.

पवार म्हणाले की, पक्षांतर केलेल्या लोकांना केंद्र आणि राज्यात सत्तेशिवाय आपल्याला निवडून येणे शक्य नाही, अशी भीती मनात होती. असा वर्ग अस्वस्थ, अस्थिर झाला आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेचा वापर करून अनेकांना ओढून घेत आहेत, असे पवार म्हणाले.

१९८० मध्ये आमचे ६० लोक निवडून आले. मी १५ दिवस परदेशात होतो, त्यादरम्यान आमचे सर्व लोक फोडले. मी देशात परतलो तेंव्हा आमच्याकडे फक्त ६ आमदार शिल्लक होते. पण तेंव्हाही मला चिंता नव्हती. कारण त्यानंतरच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले ते पराभूत झाले आणि पुन्हा आमचे ६० आमदार निवडून आले. त्यामुळे हे सर्व आम्ही अनुभवले आहे, असे पवार म्हणाले.