‘सत्ताधारी आणि विरोधक मिळून कोरोनावर मात करू’– अजित पवार

0
249

महापालिकेच्या ऑटो क्लस्टर कोव्हीड १९ सेंटरचे समारंभपूर्वक उद्घाटन

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) –”देवेंद्र फडणवीस आणि मी एका व्यासपीठावर येत असल्याच्या बातम्या गेले दोन दिवस येत आहेत, पण त्यातून कोणीही दुसरा अर्थ काढू नये. त्यात कुठलेही राजकारण नाही. आमची राजकीय भूमिका वेगळी असू शकते. कोरोनाच्या या संकटात सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून एकत्र लढाई लढली पाहिजे, म्हणजे आपण त्यावर सहज मात करू शकतो,” असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे २०० बेडचे अद्ययावत कोव्हीड १९ सेंटर सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुखय पाहुणे म्हणून उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्ताधारी नेते नामदेव ढाके, जेष्ठ नगरसेवक एकनाथ पवार, प्राधिकऱणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पीएमआरडीए चे मुख्याधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या अर्धा त्यासाच्या भाषणात पवार यांनी महापालिकेने अल्पावधीत उभारलेल्या या रुग्णालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. पवार म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट अजून थांबलेले नाही. कोव्हीड सेंटर सुविधेमुळे आता किमान पिंपरी चिंचव़ड अथवा जिल्ह्यातील कुठल्याही रुग्णाला बेड उपलब्ध नाही, अशी वेळ येणार नाही. परवडाणऱ्या दराने दर्जेदार उपचार इथे मिळतील. भारताताली पहिली लस सिरम इन्स्टिट्यूट ने तयार केली. काल दोन व्यक्तींवर लस चाचणी केली. देशातील ही पहिली चाचणी आहे आणि त्यात यश मिळेल अशी खात्री आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन प्रयत्न करते आहे, पण जनतेनेही तितकीच समर्थपणे साथ दिली पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. श्री गणेशला प्रार्थना करताना कोरोनाचे संकट लवकर दूर कर, असे साकडे पवार यांनी घातले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवडचे कोव्हिड सेंटर उपयोगी ठरेल, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या रोज १४-१५ हजार येत आहे. चाचण्या आणखी वाढविण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या, कोरोना बाधा झालेल्यांवर उपचार आणि आयसोलेशन या माध्यमातूनच आपण कोरोनावर मात करू शकतो. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रिकव्हरी रेट ८५ टक्के आणि मृत्यू दर १.८ टक्के आहे. आयसीएमआर च्या निकशानुसार कोरोना प्रसार ५ टक्के पर्यंत आणि मृत्यूदर १ टक्के पर्यंत खाली आला पाहिजे.
सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी प्रास्ताविक तर महापौर माई ढोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार प्रदर्शन केले.