“संवाद हा परिवर्तनाचा सेतू!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

0
402

पिंपरी,दि.१५ (पीसीबी) “कोणी कितीही कट्टर विरोधक असला तरी संवाद हा परिवर्तनाचा सेतू असतो. त्यामुळे सर्व विचारधारांशी सुसंवाद साधला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आचार, विचारांच्या मुशीतून मी घडलो, जगलो आणि काम केले. मेकॉले आणि मार्क्सवाद यांनी आपल्या देशाची संस्कृती नष्ट केली आहे. पुन्हा समृद्ध भारताचा सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर आपले पारंपरिक ज्ञान, कलाकौशल्ये पुन्हा रुजवणे याला पर्याय नाही!” असे विचार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाच्या ३६व्या वर्धापनदिनानिमित्त पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि अरुंधती प्रभुणे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, पिंपरी-चिंचवड जिल्हा सहसंघचालक विनोद बन्सल, रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयाचे कार्यवाह प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी यवतमाळ येथील ओंकार राष्ट्रदेव सार्वजनिक वाचनालय आणि ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय डाळिंब, तालुका दौंड येथील ग्रंथालयांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदान करण्यात आले. त्यानंतर चित्रांवरून आशय व्यक्त करणाऱ्या ललित, कथा, काव्यलेखन स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे :-
ललितलेखन प्रथम क्रमांक : माधवी पोतदार, द्वितीय क्रमांक : वंदना गुर्जर, तृतीय क्रमांक : पुष्पा नगरकर, उत्तेजनार्थ : सुनंदा जप्तीवाले

कथालेखन प्रथम क्रमांक : माधुरी विधाटे, द्वितीय क्रमांक : अर्चना वर्टीकर,तृतीय क्रमांक : उल्का खळदकर
उत्तेजनार्थ : जयश्री पाटील

काव्यलेखन प्रथम क्रमांक : योगेश उगले, द्वितीय क्रमांक : सुरेखा हिरवे , तृतीय क्रमांक : सुरेश सेठ, उत्तेजनार्थ : प्रकाश परदेशी

विनिता ऐनापुरे, अश्विनी रानडे, अपर्णा देशपांडे आणि रमेश वाकनीस यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
तसेच यावेळी कोरोना लॉकडाउनच्या काळात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
रवींद्रनाथ ठाकूर यांचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ग्रंथालय कार्यवाह प्रदीप पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “४९ हजार ग्रंथ, १५२७ सभासद आणि ३६ वर्षांचा कार्यकाल असलेले रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय हे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुने, सर्वांत मोठे ग्रंथालय असून ग्रामीण भागातील वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रतिवर्षी दोन ग्रंथालयांना ग्रंथदान आणि पारितोषिक प्रदान करण्यात येते!” अशी माहिती दिली.

विश्वास करंदीकर, चंद्रशेखर जोशी आणि आनंद रायचूर या त्रयींनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांमधून पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि अरुंधती प्रभुणे या दांपत्याची सुमारे अर्धशतकी कालावधीतील प्रेरणादायी वाटचाल श्रोत्यांसमोर उलगडत गेली.

शिशूवयात झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे संस्कार, विद्यार्थिदशेत लागलेले वाचनाचे प्रचंड वेड अन् त्यातून दोन-तीन वेळा घर सोडून जाण्याची ऊर्मी, भटक्या-विमुक्त जमातीत भेटलेले मित्र आणि त्यांचा सखोल प्रभाव कथन करताना प्रभुणे यांनी संघप्रचारक म्हणून आलेले अनुभव, अरुंधती यांच्याशी झालेला प्रेमविवाह त्यानंतर चिंचवड येथे दहा बाय पंधरा फुटांच्या गळक्या खोलीत तीन मुले, पंधरा-वीस कुटुंबीय अन् पै-पाहुणे यांतून झालेली प्रापंचिक ओढगस्त शिवाय ‘असिधारा’ हे नियतकालिक चालवल्यामुळे आलेला कर्जबाजारीपणा, झालेली मारहाण कथन केली.

‘माणूस’ या नियतकालिकात तुटपुंज्या मानधनावर केलेले लेखन परंतु दि.बा.मोकाशी, विजय तेंडुलकर अशा अनेक प्रतिभावंतांशी झालेली ओळख त्यांतून निमगाव म्हाळुंगे येथील प्रकल्पावर काम करण्याची मिळालेली संधी जीवनाला कलाटणी देणारी ठरली. समाजातील वंचितांमध्ये राहून केलेले काम आणि पुढे अतिशय नावारूपाला आलेल्या ‘यमगरवाडी’ प्रकल्पाचे अनुभव प्रभुणे यांनी सांगितले.

२००६ साली चापेकर वाड्याची उभारणी, तेथे पारधी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणताना वाट्याला आलेली बदनामी सोसून पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् प्रकल्प उभा करून त्याची आजपर्यंतची वाटचाल प्रांजळपणे कथन करून उपस्थितांना अंतर्मुख केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निष्ठावान कार्यकर्ता असलो तरी संघाच्या कट्टर विरोधकांशी नेहमीच सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. अरुंधती प्रभुणे यांनी बालपणापासून मोठ्या कुटुंबात वावरल्याने शिक्षिकेची नोकरी करून प्रपंचातील कष्ट आनंदाने सहन केले, असे नम्रपणे नमूद करून आपली समर्पित वृत्ती प्रकट केली.

रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. विनीत दाते यांनी सूत्रसंचालन केले; तर सतीश सखदेव यांनी आभार मानले.