संभाजी राजेंचा इतिहास सर्वाच्या समोर आणण्याची गरज आहे राजेंचा खरा इतिहास समोर मांडणार – डॉ. अमोल कोल्हे

0
386

अमरावती, दि.१० (पीसीबी) –विदर्भात दुसऱ्यांदा शिवपुत्र संभाजी महानाटय़ाचे आयोजन होत असून ही आपल्यासाठी कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाटय़ातून युवा पिढीवर संस्कार घडवण्याचे काम होत आहे. आज संभाजी राजेंचा जाज्वल्य इतिहास सर्वाच्या समोर आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केले.

युवासंवाद प्रतिष्ठान आणि आयोजन समितीच्या वतीने येथील सायन्सकोर मैदानावर ९ ते १३ जानेवारी या कालावधीत शिवपुत्र संभाजी महानाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. महानाटय़ाच्या शहरातील पहिल्या प्रयोगाआधी पत्रकारांशी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, संभाजी राजे आणखी जगले असते, तर भारतचा इतिहास हा वेगळा असता. संभाजीराजे हे योद्धा होते. कुटुंबवत्सलही होते. ग्रंथकारही होते. बलाढय़ अशा औरंगजेबासोबत त्यांनी आठ वष्रे झुंज दिली. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्या काळातील इतिहास लोकांसमोर येणे आवश्यक आहे. आता स्वराज्यरक्षक संभाजी ही दूरचित्रवाणी मालिका शिखरावर असताना अमरावतीत या महानाटय़ाचे प्रयोग होत आहेत, ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

एक कलावंत आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही भूमिका पार पाडत असताना धावपळ होत असल्याची कबुली डॉ. कोल्हे यांनी दिली. आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे महानाटय़ात काहीवेळा माझ्याऐवजी अन्य कुणीतरी संभाजीराजेंची भूमिका साकारत असतो, अशा अफवा पसरवल्या जातात, पण त्यात तथ्य नाही. प्रत्येक प्रयोगाला मीच असतो, असे डॉ. कोल्हे म्हणाले. यानंतर महानाटय़ाचे प्रयोग कोकणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.