संघर्षपूर्ण विजयासह क्रेजीकोवा अंतिम फेरीत

0
411

पॅरिस, दि.११ (पीसीबी) : चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजीकोवा हिने कमालीच्या जिद्दीने खेळ करत मॅरेथॉन लढतीत ग्रीसच्या मारिया सकारी हिचे आव्हान परतवून लावत यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

महिला एकेरीच्या या दुसऱ्या उपांत्य लढतीत तब्बल ३ तास १८ मिनिटांनी क्रेजीकोवाने सकारी हिच्यावर ७-६, ४-६,९-७ असा विजय मिळविला.

जागितक क्रमवारीत ३३व्या स्थानावर असणाऱ्या क्रेजीकोवा हिने निर्णायक क्षणी मॅच पॉइंट वाचवत सकारीची सर्व्हिस भेदली. त्या वेळी सकारी निर्णायक सेटमध्ये ५-४ अशी विजयाच्या उंबरठ्यावर उभी होती. त्यानंतर आपल्या खेळावर नियंत्रण राखत क्रेजीकोवाने अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. क्रेजीकोवाला पाचव्या प्रयत्नांनंतर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचण्यात यश आले. विजेतेपदासाठी आता तिची गाठ रशियाच्या अॅनास्तासिया पावल्युचोन्कोवाशी पडेल.

क्रेजीकोवा आणि सकारी यांची लढत कमालीची रंगली. प्रत्येक गुणासाठी दोघींना संघर्ष करावा लागत होता. सकारीच्या काहिशा जोरकस फटक्यांना क्रेजीकोवाने कमालीच्या चपळतेने उत्तर दिले. सर्वोत्तम टेनिसचे प्रदर्शन या लढतीत पहायला मिळाले.
मला अशीच लढत खेळायची होती. टेनिस खेळायला लागव्यापासून कुमार गटापासून मला नेहमी अशीच लढत खेळावी असे वाटत होते. मी आज जरी हरले असते, तरी मला अभिमान वाटला असता. कारण मी संघर्ष केला होता. खेळातच नाही, तर आयुष्यातही समोरच्याला प्रतिकार करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया क्रेजीकोवाने कोर्टवरून बोलताना दिली.

क्रेजीकोवा आता कॅटरिना सिनीआकोवा हिच्यासाथीत दुहेरीची उपांत्य लढत खेळणार आहे. उद्या शुक्रवारी त्यांची गाठ मॅगडा लिनेट्टे आणि बर्नार्डा पेरा या जोडीशी पडणार आहे.