संगीत क्षेत्रातील माफिया हे चित्रपट क्षेत्रांपेक्षाही खतरनाक

0
312

मुंबई, दि. २० (पीसीबी) : आत्महत्या केलेला अभिनेता सुशांतसिंह राजपुत याच्या निधनानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमने दोन मोठ्या म्युझिक कंपन्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने दोन मोठ्या म्युझिक कंपन्यांवर गंभीर आरोप केले. या दोन कंपन्या नवे गायक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि निर्मातांना काम करु देत नाहीत. या म्युझिक कंपन्यांमुळे चित्रपट क्षेत्रातील संगीतकारही आत्महत्या करु शकतात, असा आरोप सोनू निगमने केला.

संपूर्ण देश सध्या अनेक गोष्टींच्या तणावात आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या डोळ्यांसमोर एखादा तरुण आणि हुशार अभिनेता आत्महत्या करतो, ही खूप वाईट आणि दु:खद घटना आहे. दुसरीकडे लडाख सीमेवर भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या झडपमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. एक भारतीय नागरिक होण्याबरोबरच मी एक माणूस आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींच्या माझ्या मनावर खोलवर आघात झाला आहे. मला खूप वाईट वाटत आहे.आज एका अभिनेत्याने आत्महत्या केली. उद्या कदाचित एखादा गायक किंवा संगीतकाराच्या आत्महत्येची बातमी येईल. संगीत क्षेत्रातील माफिया हे चित्रपट क्षेत्रांपेक्षाही खतरनाक आहेत. सध्या वातावरण फार वाईट आहे. व्यवसाय करणं ठिक आहे. मात्र, अशाप्रकारची वागणूक देणं चुकीचं आहे. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा मी फार लहान होतो. त्यामुळे मी यातून निघून गेलो. मात्र, संगीत क्षेत्रात येणाऱ्या नव्या मुलांना त्रास भोगावा लागत आहे.संगीत क्षेत्राची ताकद सध्या दोन लोकांच्या हातात आहे. कोणत्या गायकाला घ्यायचं किंवा घ्यायचं नाही, हे ते ठरवतात. मात्र, असं करु नका. अनेक गायकांशी माझी दररोज चर्चा होते. ते खूप त्रस्त आहेत. कारण आज संगीत क्षेत्राची ताकद फक्त दोन कंपन्यांकडे आहे.

सलमान खानवरही नाव न घेता टीका

“एखादा अभिनेता माझं गाणं ठरवतो. तोच अभिनेता आज ज्याच्याकडे सगळे लोक बोट दाखवत आहेत. तो म्हणतो, याला गाणं गाऊ देऊ नका. त्याने गायक अरजित सिंह सोबतही तसंच केलं होतं. हे असं व्हायला नको. माझ्याकडून गाणं गायचं आणि त्यानंतर डबिंग करायचं. हे चूकीचं आहे. जर माझ्यासोबत एवढ्या गोष्टी घडू शकतात तर नव्या मुलांसोबत काय होत असेल? त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. जरा दया दाखवा”, असं सोनू निगम म्हणाला.