चिंचवड, दि. २० (पीसीबी) – चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची माघी रथयात्रा रविवार (दि.22) पासून सुरु होणार आहे. 1 फेब्रुवारीला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज हे दरमहा श्री मयुरेश्वराच्या दर्शनास जात असत. श्री मोरया गोसावी महाराजांना वयाच्या 117 व्या वर्षी सन 1489 मध्ये मयूरेश्वराची तांदळा मूर्ती मोरगाव येथील गणेश कुंडात प्राप्त झाली. वार्धक्यामुळे श्री मोरया गोसावी दरमहा न जाता फक्त माघ व भाद्रपद महिन्यात मोरगाव येथे जावू लागले. चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची प्रसादमुर्ती माघ महिन्यात रथातून पालखी मोरगाव येथे घेऊन जाण्याची ही परंपरा गेली सुमारे 525 वर्ष पेक्षा अधिक काळ अविरत सुरू आहे.
ही माघी रथयात्रा येत्या रविवारपासून (दि.22) सुरू होत आहे. पालखी प्रस्थानाच्या निमित्तमोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी दुपारी बारा वाजता पालखी प्रस्थान करणार आहे. मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवड लिंकरोड, जुना मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा मार्गे जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल. सोमवारी (दि.23) पहाटे साडेचार वाजता भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल. पालखी मंगळवारी (दि.24) सकाळी 6 वाजता मंदिरातून शिवरी, रासकर मळा, श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळा मार्गे रात्री नऊ वाजता मोरगाव येथे पालखी पोहोचेल.
त्यानंतर बुधवार (दि.25) आणि गुरुवारी (दि.26) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. शुक्रवार (दि.27) रोजी पालखी मोरगाव येथून जेजुरी कडे प्रस्थान करेल व मुक्काम जेजुरी येथे असेल. शनिवार (दि.28) रोजी जेजुरी येथून निघून पालखीचा मुक्काम सासवड येथील कऱ्हाबाई मंदिरात असेल. रविवार (दि.29) रोजी पालखी सासवड येथून दिवे घाट, हडपसर, सोलापूर रोड मार्गे जाऊन पालखीचा मुक्काम थेऊर येथे असेल. सोमवार (दि.30) रोजी पाटस, दौंड, शिरापूर मार्गे जाऊन पालखीचा मुक्काम सिद्धटेक येथे असेल.
मंगळवार (दि.31) रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. दौंड, पाटस, सोलापूर रोड, हडपसर, पुलगेट मार्गे एकनाथ मंगल कार्यालय, पुणे या ठिकाणी मुक्काम करीत 1 फेब्रुवारीला पालखी परत चिंचवड येथील मंदिरात येईल. सर्व मोरया भक्तांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टने केले.