बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लाटणा-या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करा – राहुल कोल्हटकर

0
199

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 2 शाळांमध्ये बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल संबंधित संस्थाचालक व तेथील शिक्षक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अनुदान रक्कम वसूल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कमला नेहरू विद्यालय व ज्ञानज्योती विद्यालय या दोन शाळा यांनी गेल्या अनेक वर्षापासून बोगस विद्यार्थी दाखवून महाराष्ट्र शासनाचे अनुदान घेतले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थी यांची पटसंख्या पाहून शालेय साहित्य , मध्यान भोजन , अतिरिक्त तुकड्यासाठी शिक्षक पद भरती यासाठी दरवर्षी अनुदान देत असते. राज्यातील अनेक खाजगी अनुदानित शाळांना लाखो रुपयांचे अनुदान दिले जाते. खऱ्या अर्थाने मराठी शाळा टिकवणे शासनाचे उदिष्ट असल्याने त्यांना सर्वतोपरी सहकार्य शासनाच्या वतीने करण्यात येते. त्यामुळे आजही राज्यातील अनेक गावं खेड्यात शहरात मराठी शाळा टिकून आहेत. दर तीन वर्षांनी शहरातील अनुदानित शाळा यांना जिल्हा परिषदेकडून स्वयं मान्यता घ्यावी लागते. त्याची शिफारस महापालिका शिक्षण विभाग यांच्याकडून करण्यात येत असते.

शहरातील या 2 शाळा गेल्या अनेक वर्षापासून कमी पटसंख्या दाखवून शाळा चालू ठेवत आहे. मागील काही दिवसापूर्वी निधी अभावी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. पण, डोंगर आदिवासी भागातील विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. या दोन शाळांनी गेल्या 10 वर्षात शासन अनुदान याचे लाखो रुपये लाटले आहेत. तसेच या शाळेत शिक्षण देणाऱ्या शिक्षक वर्ग यांनी ही विद्यार्थी नसताना सुद्धा शासनाचे वेतन घेतले आहे. खरे पाहता कोणत्या शाळेत जर विद्यार्थी संख्या कमी असेल. तर, अतिरिक्त शिक्षक यांना दुसऱ्या शाळेत पाठवण्यात येते. पण, या शैक्षणिक संस्था यांनी विद्यार्थी यांची बनावट नोंदणी दाखवून अतिरिक्त तुकड्या दाखवून शिक्षक त्याच ठिकाणी ठेवले. खरे पाहता शाळांची तपासणी करण्याचे काम शिक्षण विभाग यांचे आहे. पण या संस्था गेल्या अनेक वर्षापासून ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी तसेच बनावट नोंदणी दाखवून शासनाची फसवणूक करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बोगस पटसंख्या दाखवून शासनाची फसवणूक करणाऱ्या 2 शाळांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खातेनिहाय चौकशी करावी.