शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्याआधीच शिवसेनेची बॅनरबाजी

0
557

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) – “गोर गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जावर रुपये दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमुक्ती, करुन दाखवले” अशी बॅनर्स शिवसेनेने राज्यातील अनेक शहरांमध्ये झळकवली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती.

‘शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळण्याआधीच शिवसेनेकडून बॅनरबाजी करुन कर्जमाफीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे,’ असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

२४ डिसेंबर रोजी सह्य़ाद्री अतिथिगृहावर पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मान्यता देण्यात आल्यानंतर ही बॅनर्स लावण्यात आली आहेत.

 

विशेष म्हणजे या बॅनर्सवर महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उल्लेख टाळण्यात आला आहे. औरंगाबाद, पिंपरी-चिंचवडसहीत इतर काही शहरांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो असणारे कर्जमुक्तीसंदर्भातील मोठे बॅनर्स झळकवले आहेत. उद्धव यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो या बॅनर्सवर आहे. मात्र या बॅनर्सवर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या नव्या मित्रपक्षांचा साधा उल्लेखही नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.